Sanjay Raut on Supriya Sule : तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही, संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला
- wix2266@gmail.com
- May 29
- 2 min read

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, माननीय मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्याचं कौतुक केलं आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तुम्ही राजकीय टीका कितीही केली तरी हे जे एका नेत्यामध्ये गुण आहेत ते महाराष्ट्राला आणि देशाला मान्य करावे लागतील. नुसतं कौतुक करून चालणार नाही, परिश्रम, सातत्य, संयम या गुणांची कास देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील घेतली पाहिजे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
भाजपचा काही भरवसा नाही
संजय राऊत पुढे म्हणाले की, पराभव किंवा निवडणुकीचे यश, अपयश हे अनेक नेत्यांना थांबवत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक निवडणुका लढवल्या, हरले, काम केले. आता माननीय शरद पवार साहेब सर्वांचे आदर्श आहेत. ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं, त्याअर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असणार. भाजपाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात. फडणवीस यांनी छगन भुजबळ यांचे देखील कौतुक केले. त्यांना त्यांनी तुरुंगात टाकलं होतं. भाजपचा काही भरवसा नाही, असेही त्यांनी म्हटले.
राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालंय
शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत, असं मला वाटतं. आता ते कोचिंगच्या भूमिकेत आहेत. त्यांची विचारधारा, भूमिका मला माहित आहे. त्यांचं वय 85 वर्ष आहे. परंतु अशा नेत्यांना वयाची बंधने नसतात. त्यांच्या भूमिका विचारधारा पाहिल्यावर ते भाजपसोबत कधीच जाणार नाहीत, हा मला विश्वास आहे. आम्ही घडवलेल्या काही पिढ्या गेल्या त्याला आम्ही काय करणार? माननीय बाळासाहेब यांनी घडवलेले अनेक लोक पळून गेले. राज ठाकरे असतील, गणेश नाईक असतील ते पळून गेले. सध्याच्या राजकारणात कुणी कुणाच्या हातात राहत नाही. राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे.
अजित पवारांना झोप देखील लागत नसेल
लोकांना आपल्या प्रॉपर्टी वाढवायच्या आहेत आणि केंद्रीय तपासणी करण्याचा दबाव असतो, त्यामुळे भयभीत होऊन लोक जातात. शरद पवारांना सोडून गेलेले लोक आनंदी मनाने गेली असतील, असं मला वाटत नाही. भुजबळ यांना अजित पवार यांना न विचारताच मंत्री केलं. अजित पवार यांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात, अजित पवारांना झोप देखील लागत नसेल, असे म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
राऊतांचा सुप्रिया सुळेंना टोला
संजय राऊत पुढे म्हणाले की, सुप्रिया सुळे याचं किंवा अन्य काही नेत्यांचं नाव तुम्ही वारंवार घेत आहात. त्यांना तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातलं गढूळ पाणी पीत नाही. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात जरी उडी मारायचं ठरवलं तर त्या साागरात इतक्या लाटा उसळल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये , की प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत, तेच धडपडतायच तिथे अस्तित्वासाठी, नवी जाऊन काय करणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Comments